पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार !आ.श्रीकांत भारतीय यांनी दिले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सत्कार समारंभात आश्वासन
पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार !
आ.श्रीकांत भारतीय यांनी दिले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सत्कार समारंभात आश्वासन
औरंगाबाद : मी पत्रकारिता क्षेत्रात पूर्वी कार्यरत होतो. त्यामुळे मला पत्रकारांचे प्रश्न माहित आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांचा आणि माझा खूप वर्षापासूनचा परिचय आहे. तेही मला सतत पत्रकारांचे प्रश्न, पत्रकारांच्या समस्या सांगत असतात. आता आपले सरकार असल्यामुळे मी पत्रकारांचे प्रश्न प्राधान्य देऊन सोडवीन, असे आश्वासन आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिले. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत भारतीय प्रथमच औरंगाबादेत आले असता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते निर्वाचित आमदार श्रीकांत भारतीय यांचा सत्कार करण्यात आला.यावेळे वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या समस्या मांडल्या. आपण प्रत्यक्ष केल्यामुळे आपल्याला पत्रकारांच्या समस्या माहीत आहेत. पण कोरोनानंतर त्यात मोठी वाढ झाली आहे.मुद्रित माध्यमांची अवस्था बिकट झाली आहे.हजारो पत्रकार बेरोजगार झाले आहेत. आता तुमच्या रूपाने आपला माणूस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे आमच्या आपेक्ष वाढल्या आहेत,असे साकडेच वसंत मुंडे यांनी आमदार श्रीकांत भारतीय यांना घातले. श्रीकांत भारतीय यांनी वसंत मुंडे यांच्या सर्व मागण्यांचे सकारात्मक घेत पुढे सांगितले की, पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळातची वाट बघण्याची गरज नाही. दैनंदिन कामकाजामध्ये पत्रकारांचे प्रश्न मांडून ते सोडून घेऊ.शासनाच्या अनेक योजनांमध्ये पत्रकारांचा सहभाग कसा होईल, याची मी दखल घेऊन त्यांचे प्रश्न नक्की सोडवेल असेही पुढे त्यांनी सांगितले. आमदार श्रीकांत भारतीय यांची ‘तर्पण’ ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असणारी संस्था आहे. तर्पण या संस्थेविषयी बोलताना ते म्हणाले की, आमची संस्था अठरा वर्षावरील अनाथ मुलांच्यासाठी सतत कार्यरत असते. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 168 अनाथ मुलांचे शिक्षणाचे,नोकरीचे प्रश्न सोडवलेले आहेत. अखिल भारतीय स्तरावर अशा प्रकारची 18 वर्षावरील मुलांचे प्रश्न सोडवणारी तर्पण ही संस्था एकमेव आहे. स्वबळावर, स्वखर्चावर तर्पण ही संस्था आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. असंख्य लोकांचा हातभार तर्पण संस्थेला लागत आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला एक मुलगा आज अमेरिकेमध्ये जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. मला सांगायला आनंद होतो की, आमच्या संस्थेच्या या मुलासाठी आम्ही त्याची अमेरिकेत राहण्याची, शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.
यावेळी ओमप्रकाश शेटये, राजू शिंदे, समीर राजुरकर, शिवाजी दांडगे, मनोज भारस्कर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डाॅ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, ज्येष्ठ पत्रकार रवी गाडेकर प्रसिद्धीप्रमुख संजय व्यापारी, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कोर्टीकर, ज्ञानेश्वर तांबे पाटील, सोमनाथ शिंदे,अनिस रामपुरे, ज्ञानेश्वर बावणे, आरेफ देशमुख, सतिश देशपांडे, गोरख जैस्वाल आदी पत्रकारांची उपस्थिती होती.