महाराष्ट्र मास्टर्स अथलेटिक मीटचे यजमानपद औरंगाबादला दोन दिवसीय वार्षिकसर्वसाधारण सभा शहरात संपन्न,खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या साक्षी चव्हाण चा सत्कार
महाराष्ट्र मास्टर्स अथलेटिक मीटचे यजमानपद औरंगाबादला दोन दिवसीय वार्षिक
सर्वसाधारण सभा शहरात संपन्न
औरंगाबाद 18 जून शहरात संपन्न झालेल्या दोनदिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्रस्तरीय
मास्टर्स अथलेटिक स्पर्धेचे यजमानपद औरंगाबादला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा औरंगाबादेत
या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खेळवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय अथलेटिक्स
महासंघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र अथलेटिक संघटनेचे अध्यक्ष तथा ऑलिम्पियन आदिल सुमारीवला
यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभा औरंगाबादेत शुक्रवारी
आणि शनिवारी पार पडली. शुक्रवारी पहिल्या दिवशी संघटनेची कार्यकारी समितीची बैठक पार पडली.
शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत
स्पर्धांचे वेळापत्रक एकमुखाने अंतिम करण्यात आले, आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.
महाराष्ट्रस्तरीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धाचे यंदाचे यजमानपद औरंगाबादला देण्याचा निर्णय
यावेळी घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष सुमारीवाला यांनी सांगितले. डोपिंग आणि वयोमर्यादा या दोन
विषयांवर सखोल चर्चा यावेळी करण्यात आली. नियमावलीबाबत बोलताना सुमारीवाला यांनी सांगितले
की सर्व नियमांची अंमलबजावणी ही जिल्हास्तरावर काटेकोरपणे करावी ज्यामुळे पुढील स्पर्धात खेळाडूंचे
नुकसान होणार नाही.
4x400 रिलेच्या माध्यमातून खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मूळ औरंगाबादची
साक्षी चव्हाण या महिला खेळाडूचा सत्कार यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे करण्यात आला. तिला
संघटनेचे सहसचिव पंकज भरसाखळे यांच्या वतीने अकरा हजारांचे प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य श्री.
सुमारीवाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव सतीश उचील, सहसचिव पंकज भरसाखळे,
खजिनदार माधव शेजवळ, औरंगाबाद जिल्हा सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. दयानंद कांबळे यांची
उपस्थिती होती.